लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र पोलीस आणि C-60 कमांडोंनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी गडचिरोलीच्या जंगलात C-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. कमांडोंनी 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या शस्त्रास्त्रांमध्ये एके ४७, कार्बाइन, २ देशी बनावटीचे पिस्तूल तसेच नक्षलवादी साहित्यही जप्त करण्यात आले आहे. चकमक परिसरात पोलीस आणि C-60 कमांडोकडून शोध मोहीम राबवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत गोंधळ घालण्याच्या प्लॅनिंगचा एक भाग म्हणून नक्षलवादी तेलंगणा सीमा ओलांडून गडचिरोलीत प्रवेश करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी चकमक होऊन नक्षलवादी ठार झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 36 लाखांचे सामूहिक बक्षीस असलेले चार नक्षलवादी चकमकीत ठार झाले आहेत.