गणपती विसर्जनाला गालबोट; पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकला अन् घात झाला

तरुण भारत लाईव्ह । २९ सप्टेंबर २०२३।  चंद्रपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गणपती विसर्जनासाठी आलेल्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुमित बाळा पोंगळे वय २० असे मयत युवकाचे नाव आहे. ही घटना म्हातारदेवी-शेनगाव तलावात घडली.

सूत्रानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथे साईनगर वार्डात राहणारे दत्तात्रय मस्के यांचा घरी गणपतीची स्थापना करण्यात आली होती. आज महाप्रसादाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यात असणारा सुमित बाळा पोंगळे हा त्यांचा भाचा आला होता.  गुरुवार रोजी विसर्जन करण्यासाठी संपूर्ण परिवार  म्हातारदेवी – शेनगाव रस्त्यावरील तलावात गेले होते. गणरायाची विधिवत पूजा करून तलावात विसर्जन करण्यासाठी सर्व उतरले. विसर्जन झाल्यावर बाळाने डुबकी मारली. मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही.

जेसीबीच्या साह्याने तलावात खोल खड्डे खोदले गेले होते. या खोल खड्ड्यात सुमित फसल्याने त्याचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मासेमाऱ्यांना बोलावले. आणि पाण्यात सर्वत्र त्याचा शोध सुरु केला. या शोधमोहीम दरम्यान त्याचा मृतदेह मिळाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.