गणपती विसर्जन मिरवणुकीच्या रांगेवरुन वाद; जोरदार हाणामारी, जळगावातील घटना

जळगाव : शहरात आज गुरुवार रोजी बाप्पाचे विसर्जन होत आहे. त्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच कोर्ट चौकात सार्वजनिक गणेश मंडळानी रांगा लावण्यासाठी सुरुवात केली होती. दरम्यान, रात्री १ वाजेच्या सुमारास गणपती विसर्जन मिरवणुकीच्या रांगेवरुन कार्यकत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली.

यात दोन कार्यकर्ते जखमी झाले तर अन्य एका कार्यकर्त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर फायटरने वार केल्याचे सांगण्यात आले. या हाणामारीत आयुष गांधी हा गंभीर जखमी झाला. त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी यासाठी मोठ्या संख्येने जमाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता, मात्र कोणावरही गुन्हा दाखल झाला नसून हा किरकोळ वाद सामंजस्याने सोडवला असल्याने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह त्यांच्या मुलाने व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली, असा आरोप नेहरु चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांनी केला आहे. तसा ऑडिओ क्लीप समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.