तरुण भारत लाईव्ह । २२ सप्टेंबर २०२३। दिवसेंदिवस आत्महत्याचे प्रमाण हे वाढत चाललेले आहे. अशातच अजून एक आत्महत्याची बातमी समोर आली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी सकाळी लवकर साडी नेसवण्याचा हट्ट करणाऱ्या तेरा वर्षीय मुलीला आईने विरोध केला. याच रागातून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देहूरोड-किवळे परिसरात गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू होती. प्रधान कुटुंबीयांकडेही गणरायाच्या स्थापनेची लगबग होती. मुलगी व तिची मोठी बहीण आणि लहान भाऊ असे तिघेजण सकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाची तयारी करत होते. बाप्पाच्या आगमनाची तिला मोठी उत्सुकता होती. त्यासाठी तिने सकाळीच आईकडे साडी नेसण्याचा हट्ट धरला होता. साडी नेसून नटूनथटून तिला गणपतीचे स्वागत करायचे होते. मात्र, सकाळी साडी नेसवण्यास आईने विरोध केल्याने ती नाराज झाली होती. दुपारी या मुलीची मावशी आणि काका घरी आले होते. त्या वेळीही तिने पुन्हा आईकडे साडी नेसवण्याच्या आग्रह धरला.
त्या वेळी आई-वडिलांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेली ही मुलगी लगेच बाथरूममध्ये गेली. बराच वेळ ती बाहेर न आल्याने तिच्या मोठ्या बहिणीने बाथरूमचे दार ठोठावले. मात्र, आतून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे तिने बाहेर जाऊन खिडकीतून डोकावून पाहिले असता, ती लटकलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर कुटुंबीयांनी बाथरूमचा दरवाजा तोडून तिला खाली उतरवले आणि रुग्णालयात दाखल केले.
उपचारांपूर्वी तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. ही देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकत होती. ती अतिशय बोलकी आणि हुशार मुलगी होती. तिच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.