गणेशोत्सवाला गालबोट; तीन बालकांच्या मृत्यूने गाव झालं सुन्न

धुळे : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. दरम्यान, गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना ट्रॅक्टर खाली आल्याने तीन लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चितोड गावात घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चितोड गावात ट्रॅक्टरवर गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विसर्जन मिरवणुकीत शिरला.

यामुळे पुढे नाचणारे तीन लहान बालक ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा मध्य धुंदीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाचा तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत.