गांजाची तस्करी करायचे, अडकले पोलिसांच्या जाळ्यात, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : बेकायदेशीरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर पोलीसांनी कारवाई करत, १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेर ते जळोद शिवारातील रस्त्यावरून दोन जण विनापरवाना गांजाची वाहतूक करत असल्याची गोपनिय माहिती अमळनेर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी जळोद रस्त्यावर मंगळवारी १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता कारवाई करत दुचाकीवरून गांजाची वाहतूक करतांना दोघांना पकडले.

त्यांच्याकडून ७ किलो ९९० ग्रॅम वजनातचा गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकुण १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता पो.कॉ. अमोल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी साजन राजू पावरा वय २१ आणि विशाल कुंवरसिह पावरा दोन्ही रा. रोहिणी ता. शिरपूर जि.धुळे यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास सपोनि अजित सावळे हे करीत आहे.