गावित अन् रघुवंशी परिवारातील मतभेद राज्यस्तरीय नेते सोडविणार का ?, जिल्ह्याचे लक्ष

नंदुरबार : राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नंदुरबारमध्ये विळा-भोपळ्याचे नाते आहेत. विकास कामे असतील किवा लाभाच्या योजनामध्ये सेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना डावलत असतात, या प्रचंड रोष दोन्ही पक्षात आहेत.

शिवसेना संपर्क प्रमुख आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजप आणि शिवसेना नेत्यांना या संदर्भात तक्रार केली, नंदुरबारमधील उमेदवार बदलण्याचीही मागणी केली होती. मात्र महायुतीने डॉ. हिना गावित यांनाच उमेदवारी दिल्याने नाराज असलेले शिंदे गटाचे शिवसेना नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची, महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी भेट घेत आशीर्वाद घेतले. मात्र या भेटीत डॉ. हीना गावित यांचे स्वागत करीत चंद्रकांत रघुवंशी यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या असल्या तरी ही भेट निष्फळ ठरणार असल्याचे चित्र रघुवंशी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून दिसून येते.

काय म्हणाले आहेत चंद्रकांत रघुवंशी ? 
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेनेदरम्यानचा वाद, अर्थात गावित परिवार आणि रघुवंशी परिवारातील तीव्र मतभेद राज्यस्तरीय नेत्यांनीच संयुक्त बैठक घेऊन सोडवावेत, असे आवाहन शिंदेसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे. त्यानंतर आता भाजप व शिंदेसेनेचे नेते काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

जिल्ह्यातील भाजप व शिंदेसेनेच्या नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. गावित परिवार आणि रघुवंशी परिवार, तसेच त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. लोकसभा निवडणुकीत अद्यापही त्यांच्यातील सूर जुळून आलेले नाहीत. त्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे. अशातच शनिवारी भाजप उमेदवार डॉ. हीना गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली.

त्या भेटीनंतरही सर्व काही आलबेल झाले नसल्याचे रघुवंशी यांनी स्पष्ट केले होते. कार्यकर्त्यांची मने जुळणार नाहीत. काही बाबींसाठी राज्यस्तरीय नेत्यांनी दोन्ही परिवारांची बैठक घ्यावी, अशी मागणी रघुवंशी यांनी केली आहे.

त्यामुळे आता काय निर्णय होतो, बैठक होते का, कधी होणार, लोकसभा निवडणुकीत रघुवंशी समर्थक किती प्रमाणात आणि कसे सहभाग घेणार, याबाबत आता मतदारांमध्ये उत्सुकता आहे.