गावोगावी सांगा… महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान…

Maharashtra Politics : भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक आज पुण्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला.

काय म्हणाले जे.पी.नड्डा?
राज्यात अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारच्या काळात विकासाची कामे थांबवलीत. यामुळे महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान, हे गावोगावी जाऊन भाजप कार्यकर्त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे. कोरोनाच्या काळात सर्व पक्ष आयसीयूत होते, मात्र भाजप सामाजिक कार्यात पुढे होता, त्याची आठवण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली. यावेळी त्यानी राज्य सरकार आणि मोदी सरकारची कामगिरी जनतेपुढे नेण्याचे सांगितले.

आपल्या भाषणात नड्डा पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आल्यावर मला ऊर्जा मिळत असते. मोदी सरकारच्या काळात मोठा विकास झाला आहे. देशात गेल्या 70 वर्षात 74 विमानतळे झाली. मोदी सरकारच्या 9 वर्षांत 74 विमानतळ झाली आहेत, हा बदल आहे. भाजप आणि एनडीए म्हणजेच विकास आहे. जगात मंदी आली आहे, भारत आपल्या नितीमुळे पुढे गेला आहे. भारताला मंदीच्या झळा बसल्या नाहीत. आपल्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. आज सरकारचा जो अभिनंदनाचा ठराव केला त्याला महाराष्ट्र सरकार पात्र आहे.

आम्हाला निकालाची चिंता नाहीय, आम्हीच येणार हे माहितीय, आम्हीच पुढे जाणार आहोत. मात्र तेही मेहनीतीने होणार आहे. याठिकाणी आलेल्या प्रत्येकाने 10 लोकं जोडायची आहेत. मग आपले जाळे किती मोठे होईल, ते तुम्हाला दिसेल. राज्यात असो की देशात आता येणारी कुठलीही निवडणूक भाजप जिंकणार आहे. सर्वत्र एनडीएचा विजय होणार आहे. त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामगिरी जनतेत न्यावी, असे आवाहन जे.पी.नड्डा यांनी केले.