गिरणा नदीत पोहण्यासाठी गेला अन् नको ते घडलं… २४ तासांत आढळला मृतदेह

जळगाव : गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पिलखोड (ता. चाळीसगाव) परिसरात घडली. ओम विजय चव्हाण (१८, रा. हिसवाळ ता. मालेगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मालेगाव तालुक्यातील हिसवाळ येथील ओम विजय चव्हाण (१८) हा आजोबांचे निधन झाल्याने आईसमवेत मामाच्या गावी थांबला होता. दरम्यान गिरणा नदीला पाणी सोडण्यात आल्याने नदीत पोहण्याचा मोह आल्याने ओम हा त्याच्या नातेवाईकांसह तिघेजण पोहण्यासाठी उपखेडच्या गिरणा पात्रात गेले. पोहताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण पोहताना वाहून जात असताना कसे तरी बचावले. मात्र ओम हा पाण्यात वाहुन गेला.

घटनेची माहिती गावात समजताच गिरणा नदीत शोध घेण्यासाठी ग्रामस्थ आले. मात्र ओम पाण्याच्या वेगवान प्रवाहात गेल्याने त्याचा शोध लागत नव्हता. गावकर्‍यांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.

तसेच घटनेची माहिती मेहूणबारे पोलीसांना दिल्यानंतर पोलीसही दाखल झाले. मात्र ओमचा मृतदेह दुसऱ्या दिवशी २४ तासानंतर वरखेडे धरणाच्या गेटजवळ पाण्यात आढळून आला. याबाबत मेहुणबारे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.