मुंबई: आम्ही निवडणूक हरलो म्हणून संजय राऊत तोंड सुख घेतात, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर संजय राऊतांनी टीकास्त्र सोडले होते. यावर पलटवार करताना गिरीश महाजन यांनी राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
गिरीश महाजन म्हणाले, “आम्हाला अपेक्षा होती त्या पद्धतीनं काम झालेलं नाही. आम्ही कमी पडलो, का कमी पडलो याचा नक्की शोध घेऊ. इतक्या कमी जागा आपल्या येतील याची आम्हाला अपेक्षा नव्हती. या साऱ्या बाबींचं आत्मपरीक्षण करू, कारणमीमांसा करू. यूपीमध्ये आजपर्यंत नसेल झाले, एवढी हार त्या ठिकाणी काँग्रेसची झाली आहे. राहुल गांधींना बऱ्याच वर्षानंतर हा विजय मिळाला आहे, त्यामुळे असे वक्तव्य करतायत.
बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “दुसऱ्याला मुलगा झाला म्हणून संजय राऊत पेढे वाटतात मात्र स्वतः वांजोटे आहेत. म्हणून संजय राऊत यांनी तिकडे लक्ष द्यावं. संजय राऊत यांनी आमच्या गदा पेक्षा त्यांच्या धनुष्यबाणाकडे बघावं. धनुष्यबाण आमदार खासदार कोणीच त्यांच्याकडे राहिले नाही, म्हणून तुमचं काय आधी ते दाखवावं. महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट कुठे आहे हे आधी संजय राऊत यांनी बघावं.” असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.