गुजरातमध्ये देखील अवकाळी पाऊसाने कहर केला असून, तब्बल 20 जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. आज सकाळी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एवढेच नाही तर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
माहिती देताना राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गुजरातच्या विविध भागात वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील दाहोदमध्ये सर्वाधिक चार मृत्यू झाले आहेत. भरुचमध्ये तीन, तापीमध्ये दोन आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने मला खूप दुःख झाले आहे. या आपत्तीत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन मदतकार्यात करत आहे. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.
गुजरातमधील सुरत, सुरेंद्रनगर, खेडा, तापी, भरूच आणि अमरेली जिल्ह्यांमध्ये 16 तासांत 50-117 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारपासून पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.