गणेश वाघ
भुसावळ : भुसावळात पोलिसांनी जप्त केलेल्या खव्याचे गुजरात कनेक्शन समोर आले आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कंपनीत या निकृष्ट पद्धत्तीच्या खव्याची निर्मिती केल्यानंतर त्याचे राज्यभरात वितरण केले जाते व त्यासाठी विशेष साखळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांची तसेच अन्न व औषध प्रशासनाची कारवाई टळण्यासाठी संशयितांकडून थेट लक्झरीचा वापर केला जात असून शुक्रवारी झालेल्या कारवाईत गुजरातमधून लक्झरीत केवळ खव्याची वाहतूक झाल्याचे समोर आले असून बनावट खव्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर असल्याचे स्पष्ट होते. बनावट खवा असतानाही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी खवा तपासणीचा अहवाल लॅबमधून आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवू, असे मोघम उत्तर दिल्याने या बोटचेप्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.
कारवाई टाळण्याठी लक्झरीतून वाहतूक
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना शहरातील बेकर्या तसेच स्वीटमार्ट व हॉटेल्समध्ये गणेशोत्सवात सर्वाधिक मागणी असलेल्या माव्याच्या मोदकात गुजरात मेड बनावट खव्याचा वापर केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने त्यांनी पथकाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच पथक गुजरातमधून शहरात येणार्या वाहनांवर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी दुपारी 12 वाजता गुजरातमधील एम.के.ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी (जी.जे.01 ए.टी.1210) नाहाटा महाविद्यालयाजवळील थांब्यावर आली मात्र या वाहनात एकही प्रवासी नव्हता तर वाहनाच्या छतावर तसेच लक्झरीच्या पाठीमागील भागात बनवण्यात आलेल्या विशेष कप्प्यातून बनावट खवा आयशर (जी.जे.38 टी.ए.1800) मध्ये टाकला जात असतानाच पथकाने छापेमारी करताच खळबळ उडाली.
उत्तर महाराष्ट्रातून सर्वात मोठी कारवाई भुसावळात
विशेष पथकाने लक्झरी चालक कन्नू पटेल (37, अहमदाबाद) व आयशर चालक सैय्यद साबीर सैय्यद शब्बीर (35, अहमदाबाद) यांना ताब्यात घेत पोलीस उपअधीक्षक कार्यालयात आणले. यावेळी संबंधितांकडून गुजरातच्या एका कंपनीतून वितरीत करण्यात आलेले बनावट खव्याचे बिलही जप्त करण्यात आले तर खव्याची मोजणी केल्यानंतर एकूण 178 बॅगमध्ये एकूण पाच हजार 340 किलो खवा असल्याचे पोलीस उपअधीक्षक पिंगळे म्हणाले. उत्तर महाराष्ट्रात बनावट खवा जप्त होण्याची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी लक्झरी चालक कन्नू पटेल (37, अहमदाबाद) व आयशर चालक सैय्यद साबीर सैय्यद शब्बीर (35, अहमदाबाद) यांना ताब्यात घेतले असून दोन्ही वाहने पोलीस उपअधीक्षक कार्यालयात लावण्यात आली आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरज पाटील, हवालदार संदीप चव्हाण, चालक सहाय्यक फौजदार अनल चौधरी, नाईक संकेत झांबरे यांच्या पथकाने केली.
अन्न व औषध प्रशासनाची बोटचेपी भूमिका
अन्न व सुरक्षा अधिकारी शरद पवार तसेच सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांच्या ताब्यात पोलिसांनी बनावट खवा दिल्यानंतर संबंधिताना खव्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, जप्त केलेला खवा बनावट आहे वा नाही हे आत्ताच सांगू शकत नाही. खव्याचे नमूने तपासणीला पाठवण्यात येतील व अहवाल आल्यानंतर आम्ही ठोसपणे याबाबत काही सांगू. गुजरातमध्ये या खव्याच्या निर्मितीला परवानगी असून संबंधितांकडे बिलेदेखील आहेत, असेही त्यांनी सांगितले. भुसावळात बनावट खव्याची वारेमाप विक्री होत असताना कारवाई का नाही? या प्रश्नावर त्यांनी मनुष्यबळाची कमतरता हे कारण पुढे केले तर शहरात वर्षभरात किती बेकर्या, हॉटेल्स तसेच स्वीटमार्टच्या दुकानांची तपासणी केली ? या प्रश्नावर अधिकारी निरूत्तर झाले. अन्न व सुरक्षा विभागाकडे अशी कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही तसेच पोलिसांसारखे सोर्सेस (खबरे) नाही व खबर्यांना देण्यासाठी निधीदेखील मिळत नाही, असे धक्कादायक उत्तर संतोष कांबळे यांनी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
गुजरात मेड खवा बनतो अवघ्या आठ रुपयात एक किलो
गुजरातच्या खव्यात केवळ पाच टक्के दूध व बाकी रंग, बटाटे, हाडांचा चुरा, युरीया, आरारूट मिश्रण असते तर या खव्यात पाणी टाकताच फेस होतो. बनावट खवा बनवण्यासाठी किलोमागे जेमतेम आठ-दहा रुपयांचा खर्च येतो मात्र बाजारात या खव्याची तीनशे ते चारशे रुपये किलोने विक्री केली जाते तसेच मिठाई, माव्याच्या मोदकांमध्ये सर्रास हा खवा वापरला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भुसावळात मोठ्या प्रमाणावर विक्री
भुसावळात जप्त झालेल्या खव्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शहरात या खव्याची खरेदी करण्यासाठी मोठे नेटवर्क तयार करण्यात आले असून अनेक हॉटेल्स, बेकर्यांना त्याचा पुरवठा केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अन्न औषध प्रशासन व पोलिसांनी बनावट खव्याची खरेदी करणार्यांवर आता कारवाईचा फास आवळावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.