गुडन्यूज ! पाच दिवसात सोने-चांदीत झाली मोठी घसरण, भाव वाचून खरेदीला पडाल

जळगाव । सध्याच्या लग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. काही दिवसापूर्वी उच्चांक गाठलेल्या सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या पाच दिवसांत सोने २००० रुपयांनी तर चांदी ४००० रुपयांनी घसरले आहे. यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला.

या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच ४ डिसेंबर रोजी सोन्याचा दर विनाजीएसटी ६४ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. तर जीएसटीसह सोन्याचा दर ६६३०० रुपयांवर गेला होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी दर होता. मात्र त्यांनतर दरात चढ उतार दिसून आली.

मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सोने दरात एक हजार ३०० रुपयांची घसरण झाल्याने सोने ६३ हजार रुपये प्रतितोळ्यावर आले. ६ रोजी २५० रुपयांनी घसरण झाली. मात्र, ७ रोजी ५० रुपये आणि ८ रोजी १५० रुपयांची वाढ होऊन सोने ६२ हजार ९५० रुपयांवर पोहचले. मात्र, ९ रोजी ६५० रुपयांची घसरण झाली व सोने ६२ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर आले.

काल चांदीमध्येदेखील ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७४ हजार रुपये प्रतितोळ्यावर आली आहे. पाच दिवसांमध्ये सोने दोन हजार आणि चांदी चार हजार रुपयांनी घसरली आहे. विशेष म्हणजे अमेरिकन डॉलरचे दर वाढत असताना सोने-चांदीचे भाव कमी झाले आहे. शेअर बाजार उसळी घेत असल्याने हे भाव कमी होत असल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तविला आहे.