जळगाव । ऐन सणासुदी आणि लग्नसराईच्या हंगामात सोने आणि चांदीच्या किमतींनी ऐतिहासिक उसळी घेतल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फोडला आहे. मात्र आता खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. दोन दिवसात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
गेल्या दोन दिवसात जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात १९०० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी दरात तब्बल ३००० रुपयापर्यंतची घसरण झाली आहे. अक्षय तृतीयेचा सण जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर सोने चांदी दरात घसरण झाल्यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जळगावात रामनवमीला सोने आजवरच्या उच्चांकी ७४२०० (जीएसटीसह ७६४३०) रुपये तोळ्यावर पोहोचले होते. शनिवार (दि २०) आणि रविवार (दि २१) यात १०० रुपयांची किरकोळ घसरण झाली. सोमवारी (दि २२) बाजार उघडला तेव्हा दरात ७०० रुपयांची घसरण होत ७३४०० रुपये तोळा झाले. त्यापाठोपाठ काल मंगळवारी आणखी १२०० रुपयांची घसरण झाली यामुळे आता सध्या सोने ७२२०० रुपये प्रति तोळा झाले आहे.
दरम्यान, सोन्याच्याच दरात घसरण झाली नाही, तर चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. चांदीच्या दरात जवळपास ३००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सराफा बाजारात चांदीचा दर हा विनाजीएसटी ८१००० रुपये किलो आहे. यापूर्वी दोन दिवसापूर्वी सोमवारी सकाळी चांदीचा दर हा ८४००० रुपये किलो होता.