पुणे : जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली, तरी संपूर्ण देशभरात जुलैमध्ये समाधानकारक (दीर्घकालीन सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के) स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. जुलैमध्ये राज्याच्या बहुतांश भागात सरासरी आणि त्यापेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे आयएमडीने अंदाजात म्हटले आहे.
जूनमध्ये राज्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस कमीच झाला आहे. पावसाअभावी यंदा अनेक ठिकाणी पेरण्यांची कामे रखडली. या धर्तीवर आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी शुक्रवारी वर्तवलेल्या अंदाजात जुलैमध्ये राज्यातील पावसाची स्थिती सुधारण्याची शक्यता व्यक्त केली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता ३० ते ५० टक्के असल्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, प्रतिकूल वातावरणामुळे मान्सूनच्या आगमनास १५ दिवस उशीर झाला. मध्य महाराष्ट्रासह पुण्यामध्ये २५ जूनला मान्सून दाखल झाला. मात्र जुलैमध्ये महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे शेतकर्यांसह सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.