भुसावळ : एका गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी सुरूवातीला पाच लाखांची लाच मागत तीन लाखांवर तडजोड करणार्या खाजगी पंटरासह भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकांना धुळे एसीबीने बोदवड तालुक्यात पकडल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व खाजगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला (भुसावळ) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
तडजोडीअंती स्वीकारली तीन लाखांची लाच
एका प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागून तीन लाख देण्याचे ठरल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व सहाय्यक निरीक्षक सांगळे यांच्यासाठी लाच मागण्यात आल्यानंतर तक्रारदाराने तक्रार नोंदवली. अधिकार्यांसाठी खाजगी हस्तक ऋषी शुक्ला व पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांचा रायटर तुषार पाटील यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बोदवड तालुक्यात शुक्ला यास लाच घेताना पकडण्यात आले व नंतर पोलीस निरीक्षकांचा सहभाग स्पष्ट होताच त्यांनाही अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, हवालदार राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, हवालदार चालक सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.