तरुण भारत लाईव्ह । यावल : तालुक्यातील सावखेडासीम गावाजवळील निंबादेवी धरणात गुरांना पाणी पाजण्यासाठी आलेल्या दोघा चिमुकल्यांचा पाण्यात पाय निसटल्यानंतर धरणात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर एकाचा मृतदेह शोधण्यात यश आले तर दुसर्या बालकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. दोन्ही बालके निमछाव आदिवासी वस्तीवरील रहिवासी आहेत. आसाराम शांतीलाल बारेला (14) व नेनू किसन बारेला (10, रा.निमछाव वस्ती) अशी बुडालेल्या बालकांची नावे आहेत. आसारामचा मृतदेह शोधण्यात यश आले मात्र नेनूचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही.
रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम
सूत्रांच्या माहितीनुसार, सावखेडासीमजवळील निंबादेवी धरणावर मंगळवारी सायंकाळी गुरे चारण्याकरीता निमछाव आदिवासी वस्तीवरील ही बालके आली व धरणाच्या पाण्यात ती उरतल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व दोघे धरणात बुडाली. नागरीकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर सावखेडासीम पोलीस पाटील पंकज बडगुजर यांना माहिती देण्यात आली. अंधार होण्यापूर्वी धरणातून आसाराम शांतीलाल बारेला या बालकाचा मृतदेह काढण्यात आला मात्र नेनू बारेला या बालिकेचा मृतदेह हाती आला नाही. रात्री उशीरापर्यंत धरण परीसरात शोध मोहिम सुरू होती.