मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर झालेल्या हिंसाचारानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Home Minister Devendra Fadnavis) यांनी, वाहत्या गंगेत हात धुऊ नका, असा इशारा विरोधकांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जालन्यातली घटना ही खरोखर दुर्दैवी आणि गंभीर आहे. तेथील उपोषणकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. विविध माध्यमांतून आमचा त्यांच्याशी संवाद सुरू होता. त्यांनी उपोषण मागे घ्यावे, ही आमची विनंती होती. कारण, सरकार मराठा आरक्षणावर गंभीरतेने काम करीत आहे. हा सर्वोच्च न्यायालयाच्या(Supreme Court) निकालाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे तो एका दिवसात सुटणार नाही. मराठा आरक्षणाचा विषय सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आम्ही त्यांना याबाबत कल्पना दिली होती. मात्र, ते उपोषण सोडायला तयार नव्हते, त्यांची तब्येत खराब होत होती.