गॅसच्या किंमती कमी होणार; गॅस सबसिडीसंदर्भात मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

नवी दिल्ली : घरगुती गॅसच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे महागाईला चांगलीच फोडणी मिळत आहे. गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे गृहिणींचे किचन बजेट पुर्णपणे कोडमडून पडले आहे. मात्र गॅसधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सरकारकडून एलपीजी सिलिंडरवर सबसिडी पुन्हा सुरू केली जाऊ शकते, असे वृत्त आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या एनर्जी ट्रांजिशन कमिटीच्या अहवालात वर्षाला सात ते आठ सिलिंडरवर सबसिडी देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

एका वृत्तपत्रात एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी पुन्हा सुरू करण्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सरकार सबसिडी देण्याबाबत पुनर्विचार करू शकते. दरम्यान, ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ मोदी सरकारने २०१६ मध्ये सुरू केली होती. तेव्हापासून सप्टेंबर २०२२ पर्यंत ९.५ कोटी अल्प उत्पन्न कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहेत. आज देशातील ३० कोटी घरांमध्ये एलपीजीचा वापर केला जात आहे.

एलपीजीची किंमत जास्त असल्याने देशातील ८५ टक्के कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजीचा वापर पूर्णपणे करण्यास तयार नाहीत, असेही अहवालात सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या आधी सरकारकडून वर्षाला १२ सिलिंडरवर सबसिडी दिली जात होती. मात्र आता आठ सिलिंडरवर एलपीजी सबसिडी देण्याची चर्चा सुरू आहे. सबसिडी एलपीजी सिलिंडरची संख्या कमी केल्याने सरकारकडून दिल्या जाणार्‍या सबसिडीच्या एकूण रकमेत १३ ते १५ टक्क्यांनी घट होणार आहे.