जळगाव : गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने घरात आग लागली. यामध्ये महिलेने आपल्या सतर्कता दाखवत आपल्या प्राणांची पर्वा न करता आगीत शिरून गॅस सिलेंडरचा कॉक बंद करत पुढील मोठा अनर्थ टळला आहे. मात्र यादरम्यान आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. शहरातील गणेश कॉलनी परिसरात आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
गणेश प्रजापत हे गणेश कॉलनीमध्ये भाडे तत्वावर आपल्या कुटुंबासह राहतात. ते खाद्य पदार्थांची गाडी लावून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आपल्या तयारीत असताना गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले असताना अचानक गॅस सिलिंडरने पेट घेतला. काही क्षणातच आग संपूर्ण खोलीत पसरली.
त्यावेळी प्रजापती यांच्या पत्नी केशर प्रजापत यांनी थेट आगीमध्ये धाव घेत सिलिंडरचा कॉक बंद केला. आणि पुढी संभाव्य धोका त्यांच्या समयसुचकतेने टळला. अन्यथा या आगीत सिलिंडर फुटून या घरासह इतर घरांनाही धोका निर्माण झाला असता. आग लागल्यानंतर घरासमोर राहणारे दिलीप शिंपी यांनी अग्नीशमन विभागाला माहिती दिली. त्या वेळी तेथे एक बंब दाखल झाला व आग आटोक्यात आणून सिलिंडर बाहेर काढण्यात आले.
यावेळी अग्निशमन विभागाचे चालक देविदास सुरवाळे, संतोष तायडे, फायरमन भगवान पाटील यांनी सहकार्य केले. या आगीत रॅकवर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बरण्यांसह भांडे, कपडे व इतर साहित्यही जळून खाक झाले.