गोदाम फोडले अन् लांबविली ६ लाखांची रोकड; धुळ्यात पहाटेची घटना

धुळे : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवधान शिवारात शनिवारी पहाटे चोरट्यांनी बालाजी प्लायवूडचे गोदाम फोडले. गोदाम फोडून ड्रॉवरमध्ये ठेवलेली ६ लाखाची रोख रक्कम चोरुन नेली. चोरट्यांनी याच भागात दोन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती काही लागले नाही. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरात चार चोरटे कैद झाले आहेत.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बालाजी प्लायवूड नावाचे गोदाम आहे. चोरट्यांनी शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास लक्ष केले. वॉचमन गाढ झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी हातसफाई केली. चोरट्यांनी दुकानाच्या एका बाजुला लावलेले कुलूप तोडले. शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करत दुकानाचे ड्रॉवर शोधले. त्यात तपासणी केली असता त्यात ६ लाख रुपयांची रोकड आढळून आली. ही रक्कम त्यांनी लांबविली.

चोरटे कॅमेरात कैद
अवधान शिवारातील बालाजी प्लायवूड या दुकानात पहाटे पाऊण ते एक वाजेच्या सुमारास चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. यातील एक चोरटा हा शटर उचकटतांना दिसून येत आहे. तर अन्य तीन चोरटे दुकानाच्या आत व बाहेर पडताना दिसून येत आहे. चोरीची संपुर्ण घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. चोरट्यांनी ओळख पटू नये याकरीता तोंडाला रुमाल बांधलेला दिसून येत आहे. दुकानाचे मालक नितीन पिंगळे यांना चोरी झाल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी माहिती दिल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, मोहाडी पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील हे देखील घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली.