‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा आज उतरणार मैदानात, अनेक दिग्गजांचेही आव्हान

पॅरिस भारतीय अॅथलेटिक्स विश्वाला सोनेरी दिवसांची अनुभूती देणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा नवे कीर्तिमान रचण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

टोकियो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याबरोबरच १४० कोटी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे यावेळी नीरजच्या खांद्यावर असेल. तसेच त्याच्यासमोरचे आव्हान काहीसे कठीण असल्याचे बोलले जात आहे. कारण गेल्या काही काळापासून दुखापतींचा ससेमिरा नीरजच्या मागे लागला आहे. आज, मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडणार आहे.

यामध्ये पात्र ठरलेले खेळाडू ८ ऑगस्टला पदकासाठी आपले सर्वस्व पणाला लावतील. नीरज पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरला तर तो अशी कामगिरी करणारा पाचवा भालाफेकपटू ठरेल. सोबत वैयक्तिक प्रकारात दोन सुवर्णपदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा पराक्रमही नीरज करू शकतो.

यावर्षी भारताचा हा गोल्डन बॉय केवळ तीन स्पर्धामध्ये सहभागी झाला होता. मात्र, या स्पर्धामध्ये त्याचे प्रतिस्पर्धी लौकिकास साजेशी कामगिरी करू शकले नव्हते.

तगडे आव्हान
टोकियो ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता झेक प्रजासत्ताकचा याकूब वाल्वाडेज, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि माजी विश्व
चॅम्पियन ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स हे खेळाडू प्रामुख्याने नीरजसमोर तगडे आव्हान उभे करू शकतात. भारताच्या किशोर जेनानेसुद्धा आशियाई खेळांमध्ये ८७.५४ मीटर भाला फेकला होता. त्यामुळे त्याच्याकडून पण अपेक्षा असतील.
पात्रता फेरी

६ ऑगस्ट – ‘अ‘ गट – दुपारी १.५० ‘ब’ गट – दुपारी ३.२०

अंतिम फेरी

८ ऑगस्ट – ११.५५

नीरज चोप्रा

(सर्वोत्तम कामगिरी – ८९.९४ मीटर, मोसमातील सर्वोत्तम – ८८.३६ मीटर)

किशोर जेना

(सर्वोत्तम कामगिरी – ८७.५४ मीटर, मोसमातील सर्वोत्तम – ८०.८४ मीटर)