गोल्ड लोन अधिकाऱ्यानेच दाम्पत्याला घातला गंडा; धुळ्यातील घटना

धुळे : तालुक्यातील वरखेडी येथील एका दाम्पत्याला पारोळा रोडवरील एका बँकेतील गोल्ड लोन रिलेशनशिप अधिकारी प्रवीण जोंधळे याने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

संशयिताने गोल्ड लोन वार्षिक करून घेऊ, असं सांगत लोनची खोटी कागदपत्रे तयार करून १२८ ग्रॅम सोन्याचे दागिने परस्पर काढून घेतली. वरखेडी येथे नंदकिशोर पाटील हे पत्नी वैशालीसह वास्तव्यास आहेत.

नंदकिशोर यांना गोल्ड लोन रिलेशनशिप अधिकारी प्रवीण जोंधळे याने १३ मार्च २०२३ ते १० जून २०२४ या कालावधीत गोल्ड लोन वार्षिक करून घेऊ, असे सांगून बनावट गोल्ड लोन पावत्या, वेलकम लेटर तयार करून घेतले.

फिर्यादी यांना लग्नात भेट मिळालेला ८ ग्रॅम वजनाचा राणीहार, ४८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १४ ग्रॅमची मंगलपोत, असे एकूण बँकेत तारण ठेवलेले १२८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने परस्पर काढून लंपास केले. याप्रकरणी प्रवीण जोंधळे याच्याविरुध्द आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.