गोव्याला सांगून घेऊन गेला अयोध्येला; संतप्त पत्नीने दिला घटस्फोट

लग्नाच्या अवघ्या 6 महिन्यांनंतरच घटस्फोटाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. हनिमूनला गोव्याला नेण्याचे आश्वासन देऊन पतीने तिला अयोध्येला नेल्याने पत्नीने कौटुंबिक न्यायालयात पतीपासून घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे सांगण्यात येते. प्रकरण भोपाळच्या पिपलानी भागातील आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दोघांचे लग्न झाले. मात्र हनिमूनचे ठिकाण वादाचे कारण ठरले. पत्नीला गोव्याला नेण्याऐवजी पती बनारस आणि अयोध्येला घेऊन गेला. यामुळे संतापलेल्या पत्नीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला असून, तेथे पती-पत्नीचे समुपदेशन करण्यात येत आहे.

कोर्टात दिलेल्या अर्जानुसार, पत्नीने पतीपासून घटस्फोटासाठी केलेल्या अर्जात लिहिले आहे की, पतीने पत्नीला गोव्याला नेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र गोव्याऐवजी तो बनारस आणि अयोध्येला घेऊन गेला. कौटुंबिक न्यायालयाचे रिलेशनशिप काउंसिल शैल अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दोघांचे लग्न झाले होते.

नवरा आयटी इंजिनिअर असून चांगला पगार आहे. लग्नानंतर पत्नीने पतीला हनिमूनसाठी परदेशात घेऊन जाण्यास सांगितले होते, परंतु वृद्ध आई-वडिलांच्या प्रकृतीचे कारण देत पतीने भारतात चांगल्या ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला.

यानंतर दोघांनी गोव्याला जाण्याचे मान्य केले. पण पत्नीच्या म्हणण्यानुसार, सहलीच्या एक दिवस आधी पतीने तिला सांगितले की, त्याला त्याच्या आईला मंदिरात दर्शनासाठी घेऊन जायचे आहे, म्हणून ते अयोध्या आणि बनारसला जात आहेत. सहलीवरून परतल्यानंतर पत्नीचे पतीसोबत भांडण झाले, त्यानंतर पत्नीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला.

कौटुंबिक न्यायालयाचे रिलेशनशिप कौन्सिलर शैल अवस्थी आता पती-पत्नी दोघांचेही समुपदेशन करत आहेत. जेणेकरून तुटलेली नाती वाचता येतील. मात्र, पत्नीच्या म्हणण्यानुसार पतीने तिच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कुटुंबाला अधिक वेळ दिला आणि तिला गोव्याऐवजी अयोध्येला नेणे म्हणजे तिच्या विश्वासाचा भंग आहे.