यवतमाळ : स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या युगात आजची तरुणाई भरकटत चालली आहे, अशी ओरड नेहमीच होते. मोबाईलच्या या व्यसनाला वयाचे बंधंनच नाही. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण या मोबाईलच्या जाळ्यात अडकले आहेत. अल्पवयीन मुलांचे मोबाईल वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचे दुष्यपरिणामही जाणवू लागले आहेत. मोबाईलच्या अतिवापराच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील बांशी ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे.
आजची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. यात अल्पवयीनांची संख्या खूप जास्त आहे. तरुण पिढी भरकटू नये यासाठी बांशी ग्रामसभेत अठरा वर्षाखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्याची ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. असा धाडसी निर्णय घेणारी ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे बांशी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बांशीने मोबाईल बंदीचा आगळावेगळा निर्णय घेऊन तरुणाईला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या निर्णयाची चर्चा तर होणारच!