जळगाव । अर्थसंकल्पात कस्टम ड्यूटी घटवल्यानंतर सोन्यासह चांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसात प्रचंड घसरण झाली. पण मागील चार दिवसात दोन्ही धातूंमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत दोन दिवसात सोने दरात तब्बल १३०० रुपयाची वाढ झालीय. तर चांदी देखील २ हजारापर्यंतची वाढ दिसून आली.
खरंतर श्रावण महिन्याच्या अगोदरच सोने आणि चांदीने विक्रमी भरारी घेतली. अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सोन्याचा दर ७४ हजारावरून थेट ६९ हजाराच्या घरात आले होते. दुसरीकडे चांदी दर देखील ९३ हजारावरून ८३ हजारावर आले होते. मात्र या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये वाढ होताना दिसून आली.
जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने दरात २०० रुपयाची वाढ झाली. मंगळवारी मात्र ४०० रुपयांची घसरण दिसून आली. यानंतर बुधवारी ८०० रुपयांच्या वाढीपाठोपाठ गुरुवारीही ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसात सोने १३०० रुपयांनी वाढले आहे. यामुळे आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात सोन्याचे प्रति तोळ्याचे दर विनाजीएसटी ७०५०० रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ८५ हजार रुपयावर पोहोचला आहे.