ग्राहकांना झटका! आठवडाभरात चांदी ३३०० रुपयांनी महागली, सोने.. पहा आजचे दर

जळगाव । मे आणि जून महिन्यात दिलासा मिळाल्यानंतर जुलै महिन्यात सोने-चांदीने पुन्हा मोठी झेप घेतली होती. ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस पडझड सुरु होती. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर ५८ हजाराच्या घरात आला होता. तर चांदीचा दर ७०००० हजारांवर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण या आठवड्यात चांदीने लांब पल्ला गाठला. तर सोन्याच्या किमतीत किंचित बदल झालेला आहे.

गेल्या महिन्याभरापासून चांगली तेजी दिसून येते आहे. शनिवारी संपलेल्या आठवड्यात चांदीच्या दरात प्रती किलोमागे तब्बल सव्वातीन हजार रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर ७४,३०० रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरातील ही तेजी दोन महिन्यापूर्वीच्या विक्रमी दराकडे वाटचाल दर्शवित आहे. सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू असून ते पुन्हा ५९ हजार रुपयांच्या पुढे जात ५९ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.

अधिक मास सुरू झाल्यानंतर सोने-चांदीच्या भावात वाढ झाल्यानंतर मात्र अधिक महिना संपताच त्यांचे भाव कमी झाले. चांदीचे भाव तर ७ ऑगस्टपासूनच कमी होत जाऊन ते ७० हजार २०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी त्यात एक हजार रुपयांची वाढ झाली व चांदी ७१ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली. त्यानंतर किरकोळ चढ-उतार होत राहिला.

मात्र २२ ऑगस्ट रोजी चांदीत थेट एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली व ती ७२ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहचली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली. तसेच २४ ऑगस्ट रोजी पुन्हा एक हजार ४०० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे भाव ७४ हजार ४०० रुपये प्रति किलो झाले. २५ ऑगस्ट रोजी ४०० रुपयांची घसरण झाली मात्र २६ ऑगस्ट रोजी पुन्हा ३०० रुपयांची वाढ झाल्याने ती ७४ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचली.

पुढील महिन्यात भारतात सणासुदीचा काळ सुरु होत आहे. या काळात सोने-चांदी काय जलवा दाखवते, किती आगेकूच करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.