जळगाव । सोने आणि चांदीने मे महिन्यात मोठी भरारी घेतली. सोने 75 हजारांच्या घरात तर चांदीची लाखाकडे वाटचाल सुरु झाली आहे. याच दरम्यान जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात घसरण दिसून आलीय. सोने दरात ८०० रुपयाची घसरण झाली. मात्र चांदी दरात पुन्हा ३०० रुपयांची वाढ झाली.
गेल्या काही दिवसांपासून सोन्यापेक्षा चांदीच्या भावात अधिक वाढ होत आहे. त्यामुळे चांदीने तीन दिवसांपूर्वीच ९० हजारांचा पल्ला गाठला. सोमवार, २० मे रोजी तर त्यात थेट दोन हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ९२ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. मंगळवार, २१ मे रोजी भाववाढ कायम राहत पुन्हा ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आता चांदीचा प्रति किलोचा दर विनाजीएसटी ९२ हजार ८०० रुपयांवर आला आहे.
दुसरीकडे सोन्याच्या दरात ८०० रुपयाची घसरण होऊन ते ७४ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले.दलालांनी चांदीची खरेदी वाढवल्याने तिचे भाव वाढत असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.