“घमंडिया युतीचे कृत्य…” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले

मुंबई : घमंडिया युतीची कृती देशासाठी अत्यंत लज्जास्पद आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी लोकसभेतून विरोधी पक्षांच्या ७९ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली. विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहूल गांधीनी त्यांचा व्हिडीओ बनवला.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “देशातील दुसर्‍या क्रमांकाचे संविधानिक पद असलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांची लोकशाहीच्या मंदिराबाहेर खिल्ली उडवून विरोधी नेत्यांनी त्यांचा अपमान करणे लज्जास्पद, निंदनीय आणि अशोभनीय आहे. याहून दुर्दैवी बाब म्हणजे जेव्हा उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवली जात होती, तेव्हा राजकुमार राहुल गांधी हसत हसत व्हिडिओ बनवत होते.”
“या कृतीतून विरोधी नेत्यांची मूल्ये आणि घाणेरडी मानसिकता दिसून येते. घमंडिया युतीचे हे कृत्य देश सदैव लक्षात ठेवेल. २०२४ मध्ये या परिवरवादी आणि अहंकारी युतीचा उद्धटपणा जनता नक्कीच संपुष्टात आणेल,” असे म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे.