घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करा; कृषी विभागाचे आवाहन

नंदुरबार : कृषी विभागातर्फे निमगांव येथे खरीप हंगाम पुर्व मार्गदर्शनपर बियाणे उगवण क्षमता तपासणी व बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले. शेतकर्त्यांनी घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासुन पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.

शेतकऱ्यांनी आपल्याकडे पेरणी करीता राखुन ठेवलेले सोयाबीनचे बियाण्याची घरच्या घरी उगवण क्षमता तपासणी करुन बियाणे पुरेश्या प्रमाणात उगवुन आले तरच ते बियाणे म्हणुन पेरणी करीता वापरावे अन्यथा शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात नुकसानीस सामोरे जावे लागु शकते. या करीता सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी शेतकऱ्यांनी घरच्या घरी तपासणी करण्या करीता सोप्या पध्दत असुन गोणपाट पध्दतीत शेतकरी स्वत: पोत्यावर बियाणे ठेवुन त्याची उगवण क्षमता तपासु शकतात, पेपर पध्दतीमध्ये जर्मीनेशन पेपर आणुन त्यावर बियाणे ठेवुन त्याची उगवण क्षमता जाणुन घेऊ शकतात, कुंडी पध्दतीमध्ये एका कुंडीमध्ये बियाणे ठेवुन त्याची उगवण क्षमता तपासली जाते.

या प्रकारे माहिती देत गोणपाट पध्दतीने बियाणे उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक सोबतच पेरणी पुर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करण्याचे देखील प्रात्यक्षिक व्दारे उपस्थित शेतकऱ्यांना गावाचे कृषि सहाय्यक के.के.चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास हिरालाल गांगुर्डे, किरण कोकणी, प्रकाश पवार, विशाल चौधरी, सखाराम राऊत व जगदिश वळवी यांच्यासह गावातील इतर शेतकरी उपस्थित होते.