घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केले गजाआड, 4 लाख 83 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नंदुरबार : शहारातील उपनगर ठाणे हद्दीत दोन घरफोडी करुन फरार झालेल्या आरोपींना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  त्यांच्याकडून 4 लाख 83 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.

शहरातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन घरांचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी एकूण  ४ लाख 83 हजार 600/- रु. किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानुसार नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व उपनगर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.

उपनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 114/2024 प्रमाणे मधील गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतांना बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील एकता नगर मध्ये राहणारा शरद अरुण चव्हाण उर्फ पवन गोंधळी व त्याचे साथीदारांनी मिळून सदरचा गुन्हा केलेला असून तो सध्या पळून गेला आहे अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे पथकाने संशयित आरोपी शरद चव्हाण उर्फ पवन गोंधळी यास ताब्यात घेऊन त्याचे साथीदार हरपालसिंग ओंकारसिंग सिकलीकर व त्याचा भाऊ समशेरसिंग ओंकारसिंग सिकलीकर दोन्ही रा. एकता नगर, नंदुरबार यांचे मदतीने केल्याची सविस्तर माहिती दिली. व तसेच त्यांनी चोरी केलेला एकूण 3 लाख 50 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल काढुन दिला.

तसेच उपनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 115/2024 प्रमाणे मधील गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतांना बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील एकता नगर मध्ये राहणा-या दोघांनी मिळून केला असून ते काळया रंगाच्या मोटार सायकलने सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेतले.