घरांमध्ये होणाऱ्या प्रदूषणाचा केला अभ्यास; यशही मिळवलं

वैभव करवंदकर
नंदुरबार : वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील सृष्टी प्रमोद चिंचोले (इ. १०वी) आणि युक्ता नितीन तिडके (इ.११वी) या विद्यार्थिनींची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड झाली आहे.

सृष्टी प्रमोद चिंचोले आणि युक्ता नितीन तिडके या विद्यार्थिनींनी आरोग्य पोषण आणि स्वास्थ्य जोपासणे या विषयातंर्गत चिंचपाडा गावाच्या आदर्श कॉलनीतील घरांमध्ये होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास करून त्यावरील उपाय सुचवणे, ही समस्या घेऊन गेल्या तीन महिन्यात तब्बल 103 घरांचा सर्वे केला, परिसरातील लोकांशी चर्चा केली. तसेच डॉक्टर, दुकानदार, शाळा आणि वस्तीगृहांना भेट देऊन घरातील होणाऱ्या प्रदूषणावर चर्चा केली.

या उपक्रमाची नाशिक येथील धनलक्ष्मी माध्यमिक शाळा येथे होणाऱ्या राज्य स्तरावर राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनींना विज्ञान शिक्षक मंगेश जीवन देवरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी या विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास जयंत नटावदकर, एकलव्य विद्यालयाच्या प्राचार्या सुहासिनी नटावदकर, शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद चिंचोले, पर्यवेक्षक प्रेमल पाडवी आदींनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.