नंदुरबार : आईचा मृतदेह झाडावर लटकलेला, तर मुलाचा मृतदेह नदीत आढळल्याची घटना सरी (ता.अक्कलकुवा) येथे घडली. दरम्यान, घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करत, विवाहितेच्या नातेवाईकांनी आई-लेकाचा मृतदेह मिठात पुरून ठेवला असून, या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील टेंबरीगव्हाणपाडा (सरी) येथील तिज्या इंद्या वसावे यांची मुलगी मोगी हीचे १२ वर्षापूर्वी लोहारपाडा (साकली उमर, ता. अक्कलकुवा) येथील चंदू धन्या पाडवी याच्याशी लग्न झाले होते. या दाम्पत्यांना ५ वर्षाचा तनुष नावाचा मुलगा होता. दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी सहा वाजेच्या सुमारास ‘चंदू धन्या पाडवी’ हा नैसर्गीक विधीला सरी गावाच्या शिवारातील घाटात गेला. यावेळी त्यांची पत्नी ‘मोगी’ ही एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. मात्र मुलगा तिच्याजवळ आढळून आला नाही. याबाबत त्यांनी सासरे ‘तिज्या वसावे’ यांना सांगितले. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील, नातेवाईकांईसोबत सदर ठिकाणी तपास केला. मात्र, रात्र झाल्याने सर्वजण माघारी परतले. याबाबत पोलिसांना कळविले.
दुसऱ्या दिवशी १४ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी गेले असता मोगी चंदू पाडवी (३३) हीचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. मुलगा तनुष चंदु पाडवी (५) याचा मृतदेह ५०० मिटर अंतरावर नदीच्या पाण्यात आढळून आला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी मोलगी येथे ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले. यावेळी घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करत, विवाहितेच्या नातेवाईकांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली. त्यामुळे दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह सासरच्या मंडळींच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घातपाताचा संशय, मिठात पुरला मृतदेह
घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करत, विवाहितेच्या नातेवाईकांनी मृतदेह दोन दिवसांपासून मिठात पुरून ठेवले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसातर्फे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत पोलीस काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.