चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (४७) यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या २-३ दिवसापासून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. बाळू धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते.

शुक्रवार २६ मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारादरम्यान दिल्लीतील मेदांता रुग्णालयात पहाटे ३ वाजून ३० मिनिटानी अखेरचा श्वास घेतला.

धानोरकर यांना २६ मे २०२३ रोजी किडनी स्टोनचा त्रास जाणवू लागला होता. नागपुरात अरिहंत हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, अधिक त्रास जाणवू लागल्याने एअर अँम्बुलन्सने दिल्लीला नेण्यात आले. मेदांतामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवून डायलिसिस करण्यात आले. लाईफ सपोर्ट सिस्टीमवर असतानाच पहाटे ३ वाजता निधन झाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावचे रहिवासी बाळू धानोरकर हे मुळचे शिवसैनिक. २०१४ मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून भद्रावती वरोरा विधानसभेतून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसकडून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आले. ते राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते.