मुंबई : शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना सरकार विरोधात भावना निर्माण करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ठेवण्यासाठी व आपले लोक बांधून ठेवायचे आहेत, असा चिमटा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला. सांगली लोकसभा प्रवासात कराड येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना बावनकुळे म्हणाले, महायुतीमध्ये भाजपा हा मोठा भाऊ आहे. कुटुंब किंवा आघाडीमध्ये मोठ्या भावाने एक पाऊल मागे घेणे ही पूर्वीपासून भाजपाची भूमिका आहे, त्यात वावगे काहीच नाही.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत सांगली लोकसभा प्रवासात पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक शिंदे, शेखर इनामदार, सत्यजित देशमुख, प्रभाकर पाटील, रवी पाटील, अमरसिंह देशमुख, डॉ. रवींद्र आरळी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
• लवकरच मंत्रिमंडळ विस्तार शक्य
सरकारमध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधींची कामे आता होत आहेत. लवकरच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. असे झाले तर १४-१५ मंत्री वाढतील आणि पालकमंत्री देखील वाढतील. तसेच सरकारी कामे व योजनांना गती मिळेल.
• योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी नियुक्ती
महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांना साईड पोस्टिंग दिली. तसेच त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. त्यापेक्षा महायुती सरकारने कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना योग्य ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये क्लिनचिट मिळाली आहे, त्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांना साईड पोस्टिंग दिली. तसेच त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. त्यापेक्षा महायुती सरकारने कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना योग्य ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये क्लिनचिट मिळाली आहे, त्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.
• धार्मिक स्थळांविषयी बोलणे चुकीचेच!
धार्मिक स्थळे मंदिर, मशीद किंवा बौद्ध विहारांना लष्कराच्या ताब्यात देणे चुकीचे आहे. सर्वांच्या धार्मिक भावना वेगळ्या आहेत, अधिष्ठान वेगळे आहे. त्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी बोलणे योग्य नाही.
• मोदी-मोदींचा जयघोष; कार्यकर्त्यांशी संवाद
प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या प्रवासात तासगाव येथे कवठे महांकाळ, जत व खानापूर आणि दुपारी मिरज येथे मिरज, सांगली व पलूस-कडेगाव या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधला. सुपर वॉरिअर्सच्या मेहनतीतून पुन्हा एकदा सांगलीचा खासदार पंतप्रधान मोदींच्या समर्थनात उभा राहील असा विश्वास व्यक्त केला. तासगाव येथे गणपती मंदिर ते बागणे चौकपर्यंत आणि मिरज येथे ते ‘घर चलो’ अभियानात सहभागी झाले. त्यांनी व्यापारी व छोट्या विक्रेत्यांशी संवाद साधला. पुढचा पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारताच सर्वांनी मोदी-मोदीचा जयघोष केला. या प्रवासात त्यांनी ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ नारायण म्हात्रे, अक्षय वाघमारे यांच्याशी स्नेह भेट घेतली व मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.