जळगाव । अयोध्येतील राम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर अनेक भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. रामभक्तांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आस्था ही विशेष ट्रेन्स चालविली जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील राज्य परिवहन महामंडळाने विविध आगारातून अयोध्येसाठी बस सेवा सुरू केली आहे. आता जळगाव एसटी विभागाने पाच बसस्थानकांवरून भाविकांना अयोध्येला जाण्यासाठी बसची सुविधा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
अयोध्येसाठी कोणत्या पाच आगारातून धावणार बस?
जळगाव, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर या पाच आगारातून अयोध्या, प्रयागराज, वाराणसी (काशी) येथे ४२ प्रवासी असलेली एसटी सुविधा सुरू केली आहे. यासाठी भाविकांना अॅडव्हान्स बुकिंगनुसार एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेत कोणतीही सवलत प्रवाशांना नसणार आहे. तिकीट बुकिंग तसेच अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापकांशी संपर्क करावा, असे आवाहन जळगाव एसटी विभागाकडून केले आहे.
प्रवास मार्ग आणि भाडे असे असणार?
जळगाव येथुन चोपडा शिरपुर मार्गाने इंदोर, अयोध्या, वाराणसी-प्रयोराज परत वरई, झाशी, जळगाव अशा प्रवासास प्रती प्रवासी ४ हजार ७१० रूपये आकारले जाणार आहे. जामनेर आगारातून जाणाऱ्या भाविकांसाठी जामनेर, मुक्ताईनगर, खंडवा मार्गाने अयोध्या, प्रयागराज प्रवासासाठी ४ हजार ४६० रूपये तर चाळीसगाव येथुन धुळे, शिरपुर, इंदोर मार्गे प्रवासासाठी ४ हजार ७१० रूपये खर्च येणार आहग. चोपडा येथुन शिरपुर, इंदोर मार्गाने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना ४ हजार ५१० रूपये तर मुक्ताईनगर आगारातून जाणाऱ्या भाविकांसाठी ४ हजार ३२० रूपये भाडे असणार आहे.