जळगाव : जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा हैदोस घालायला सुरूवात केलीय. धरणगाव तालुक्यातील चांदसर गावाजवळ अवैध वाळू उपसावरून हवेत गोळीबार केला. त्यानंतर वाळू माफिया हे फरार झाले. घटनास्थळी पाळधी पोलिसांनी धाव घेतली. याबाबत पोलिसांत ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील चांदसर गावातील नदीपात्रातून वाळू उपसा होत होता. तो रोखण्यासाठी तेथे चाऱ्या खोदून रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे अवैध वाळू उपसा होत नव्हता. अवैध वाळू उपसा करण्यासाठी चांदसर व वाकटुकी येथील काही जण चाऱ्या बुजत होते.
हे कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना समजले असता त्यांनी त्याचा जाब विचारला याचा राग येवून वाळू माफियांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी वाकटूकी येथे राहणारे गोपाल कोळी यांनी त्यांचे जवळ असलेली पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यावेळी एकच खळबळ उडाली तर गावात त्याचा आवाज झाल्याने तेथेही धावपळ उडाली. हवेत गोळीबार केल्या नंतर ते पळून गेले.
घटनेची माहिती कळताच पाळधी पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. याबाबत कोतवाल अमोल मालचे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार योगेश ईश्वर कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश सोमा कोळी, मोहन गोविंदा कोळी, कल्पेश महेश पाटील, राहुल भिमराव कोळी, राहुल दिलीप कोळी सर्व रा.चांदसर गोपाल कोळी, दिपक कोळी दोन्ही रा. वाकटुकी यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स. पो. नि.प्रशांत कंडारे,मधुकर उंबरे व त्यांचे सहकारी करीत आहेत.
घटनास्थळी चोपडा भागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी घोलप, पो. नि.पवन देसले यांनी भेट देऊन तपासाबाबत माहिती दिली. आरोपीचा शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.