‘चांद्रयान-३’ने यशस्वीरित्या तिसरी कक्षा पार पाडली; पुढील फायरिंग कधी?

चांद्रयान-३ चे १४ जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. सध्या चांद्रयान हे पृथ्वीच्या भोवती फिरत आहे. यात ते टप्प्या-टप्प्याने पृथ्वीपासून दूर जाईल. पृथ्वीभोवती पाच फेऱ्या झाल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल. आज या चांद्रयानाचे तिसरे ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी झाले.

चांद्रयान लाँच केल्यानंतर दुसऱ्या दिवशी  पृथ्वीभोवती पहिली फेरी पूर्ण केली होती. यावेळी पहिले अर्थ-बाऊंड ऑर्बिट रेझिंग मॅन्यूव्हर यशस्वीपणे पार पडलं होतं. त्यानंतर १७ जुलै रोजी दुसरं ऑर्बिट रेझिंग मॅन्यूव्हर पार पाडण्यात आलं. यानंतर हे यान पृथ्वीपासून ४१,६०३ बाय २२६ किलोमीटर या कक्षेमध्ये पोहोचलं होतं. यानंतर आज चांद्रयान-३ पुन्हा पुढच्या कक्षेत ढकलण्यात आलं.

चांद्रयान-३ मोहीमेचे सगळे टप्पे वेळेवर पार पडत आहेत. आता याच कक्षेत पृथ्वीची प्रदक्षिणा घातल्यानंतर ते पुन्हा २० जुलै रोजी पुढच्या कक्षेत ढकलण्यात येईल. अशा प्रकारे ३१ जुलैपर्यंत ते पृथ्वीपासून १ लाख किलोमीटर दूरच्या कक्षेत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे.

पृथ्वीच्या कक्षेतून सुटल्यानंतर चांद्रयान-३ हे चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. त्याठिकाणी देखील चंद्राला प्रदक्षिणा घालत टप्प्या-टप्प्याने ते चंद्राच्या पृष्ठभागाजवळ जाईल. चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर उंचीवर असताना लँडर आणि रोव्हर वेगळे होतील, आणि विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी हे लँडिंग होण्याची शक्यता इस्रोने व्यक्त केली आहे.