चारवर्षीय लेकीचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू; आईवडिलांचा नेत्रदानाचा निर्णय

तरुण भारत लाईव्ह । ११ ऑक्टोबर २०२३। पालघर मधून एक धक्कादायक  बातमी समोर येत आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडून एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परंतु अपल्या मुलीचे डोळे दान करत तिच्या आई-वडिलांनी धाडसी निर्णय घेतला. दर्शनी सुरेश शालियान असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सुरेश शालियान हे मुंबईला कामानिमित्त जात असताना  त्यांची पत्नी आणि  त्यांना रेल्वे स्टेशनला सोडायला गेली होती. यादरम्यान दर्शनीला तिच्या आईनं घरात झोपवलं होतं. घरात झोपलेल्या दर्शनीला याच वेळी जाग आल्याने तिने आपल्या आईला रूममध्ये पाहिले. मात्र, आपली आई दिसत नसल्याने तिने बेडरूममधील बेडवर उभे राहून खिडकीतून इमारतीच्या खाली वाकून पाहण्याचा प्रयत्न केला. खाली वाकून पाहताना या चिमुकल्या दर्शनीचा तोल गेला आणि चिमुकली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून थेट खाली पडली. यात चार वर्षीय दर्शनीचा जागीच मृत्यू झाला.

आपल्या मुलीचा अचानक जाण्याने शालीयान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरी आपली मुलगी या जगात नाही पण तिच्या डोळ्यांनी कुणालातरी हे सुंदर जग पाहता येईल म्हणून दर्शनीच्या कुटुंबीयांनी तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. घडलेल्या या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.