जळगाव । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी एक बातमी आहे. एकीकडे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असताना आता जनावरांच्या चारा टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर चारा टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात जून अखेरपर्यंत पुरेल एवढा साठा असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त श्यामकांत पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात सद्यःस्थितीत २ लाख ५६ हजार ५९९ लहान जनावरे व ५ लाख ९७ हजार ४५९ मोठी जनावरे आहेत. एकूण ८ लाख ५४ हजार ५८ जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला दिल्या आहेत.
जिल्ह्यातील ८ लाख ५४ हजार ५८ जनावरांना रोज ४३५४.५५ मेट्रिक टन तर महिन्याला १ लाख ३० हजार ६३६.५३ मेट्रिक टन एवढा चारा लागतो. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात उत्पादित होणारा खरीप आणि रब्बी मिळून २३ लाख ९९ हजार ५४८ मेट्रिक टन एकूण चारा असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.
या विभागामार्फत तालुकानिहाय चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी संकरित ज्वारी सुगरगेजचे ९०९ किलो एवढे बियाणे वितरित केले असून, संकरित मका बियाणे २ हजार किलो वितरित करण्यात आल्याची माहिती दिली. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानात पशुपालकांना मुरघास बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचेही विभागाने सांगितले. गाई, म्हशी, बैलांना पिण्यासाठी दिवसाला ३५ ते ८० लिटर एवढे पाणी लागते. टंचाईग्रस्त भागातील जनावरांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे.