चारित्र्यावर संशय; नंदुरबारच्या विवाहितेचा जळगावात छळ, गुन्हा दाखल

नंदुरबार : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील माहेरवाशिण असलेल्या विवाहितेचा जळगावात सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय व हुंडा कमी दिला म्हणून छळ करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरुन सासरच्या मंडळींविरोधात शहादा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलीस सूत्रानुसार, शहादा शहरालगत असलेल्या लोणखेडा येथील ओम पार्क येथील माहेरवाशिण असलेल्या पूनम पाथरवट हिचा विवाह २०२२ मध्ये जळगाव येथील भारद्वाज प्रकाश पाथरवट यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच पती भारद्वाज पाथरवट (वय ३५), सासू सुनंदा प्रकाश पाथरवट (वय ५०, रा. मायकादेवी मंदिर, शनिपेठ, जळगाव) व नणंद वैशाली रवी नागपूरकर (वय ३०, रा. इंद्रपेसनगर, जळगाव) यांनी लग्नाच्या वेळी हुंडा कमी दिला या कारणावरून मानसिक व शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. त्यातच पती चारित्र्यावर संशय घेत मारहाण करू लागला.

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने पोलिसांत धाव घेत सासरच्या मंडळीविरोधात फिर्याद दिली. यावरून शहादा पोलिसात पती भारद्वाज पाथरवट, सासू सुनंदा पाथरवट व नणंद वैशाली नागपूरकर यांच्याविरोधात गुन्हा झाला आहे.