चालकाची एक चूक, प्रवाशांचा जीव टांगणीला; चक्क बस अडकली नदीत!

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये नदीत बस अडकल्याची घटना समोर आली आहे. मान्सूनच्या पावसामुळे उत्तर प्रदेशातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाणी साचल्यासारखी परिस्थिती आहे. त्याचबरोबर पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. यूपीच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पावसानंतर नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. बिजनौरमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील भागुवाला कोतवाली नदीचे पाणीही पावसानंतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. पण, नजीबाबादहून हरिद्वारला जाणाऱ्या बसच्या चालकाने नदी ओलांडण्याचा निर्णय घेतला. त्याने सहज नदी पार करण्याचा विचार केला.

मात्र, रुपाडिया आगारातील बस पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकली. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. जेसीबी मागवण्यात आला. यानंतर प्रवाशांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.