चालत्या कारने घेतला पेट; चांदसैली घाटातील घटना

तळोदा : धडगावकडे जाणाऱ्या चालत्या कारने  अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. चांदसैली गावाच्या काही अंतरावरील माता मंदिरासमोर बुधवार ३ रोजी ही घटना घडली. यात चारचाकी चार संपूर्ण जळून खाक झाली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

तळोदा येथून सकाळच्या सुमारास निघालेली डस्टर कार चांदसैलीतील खडतर घाट पास करीत अचानक अचानक मोठा पेट घेतला.  यामुळे कार काही काळ जळतच राहिल्याने आता फक्त तिचा सांगाडा उरलेला असल्याचे चित्र आहे. मात्र, चालकाने प्रसंग सावधानता दाखवल्याने जिवीत हानी टळली.  सदरील कार तळोदाहून धडगावकडे जात असल्याचे प्रत्यक्ष दर्शी सुकलाल पावरा रा. रोझवा पू. यांनी सांगितले आहे.

ही घटना  ३ जानेवारी  रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली असल्याचे बोलले जात आहे. गाडीला अचानक आग लागल्याचे पाहून परिसरातील लोकांनी येऊन आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे स्वरूप इतके प्रचंड होते की, त्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले. त्यामुळे लाखोंची गाडी डोळ्यादेखत जळाली व होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे नातेवाईक व परिसरात हळहळ निर्माण होत आहे.