चाळीसगाव : चाळीसगावकरांच्या माणुसकीचं दर्शन बघायला मिळालं असून, अपघातग्रस्त प्रवाशांना मदतीचा हात दिलाय. संभाजीनगर येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या बसला कन्नड घाटाच्या पायथ्याशी अपघात झाला. यामुळे बसमधील प्रवाशांना विशेषतः लहान बाळांच्या खाण्यापिण्याचे हाल झाले होते. ही बाब पोलिसांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात कळवली. त्यांनी तात्काळ दखल घेत प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था केल्याने खऱ्या अर्थाने चाळीसगावकरांच्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडले.
संभाजीनगर येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या बसला कन्नड घाटाच्या पायथ्याशी अपघात झाला. सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही. बसमध्ये बहुतांश मध्यप्रदेश येथील कष्टकरी मजूर वर्ग व त्यांची लहान मुले होती. अपघाताच्या ठिकाणाहुन त्यांना पोलीस दल व राज्य परिवहन महामंडळाच्या मदतीने चाळीसगाव येथे आणण्यात आले. मात्र यात बराच उशीर झाल्याने बसमधील प्रवाश्यांना विशेषतः लहान बाळांच्या खाण्यापिण्याचे हाल झाले होते. ही बाब पोलिसांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात कळवली. त्यांनी तात्काळ दखल घेत “चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नवीन कार्यालयात आणा, आम्ही तोपर्यंत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतो” असे कळविण्यात आले.
काही वेळाने सदर अपघातग्रस्त प्रवाश्यांनी भरलेली बस छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व आमदार कार्यालयातील कर्मचारी हे त्यांच्यासाठी जेवण घेऊन तयार होते. सर्व प्रवाशांना त्यांनी जेवण देत थोडा वेळ त्याठिकाणी आराम करू दिला व त्यानंतर त्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी एस.टी. बस ने धुळे रवाना केले. परराज्यातील अनोळखी अपघात ग्रस्तांना तातडीने अपघातस्थळी मदत तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून दिल्याने खऱ्या अर्थाने चाळीसगावकरांच्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडले.