चाळीसगाव तालुक्याला परतीच्या पावसाचा तडाखा

चाळीसगाव : तालुक्यात गुरूवारी आणि शुक्रवारी अतिवृष्टी झाली आहे. परतीच्या दमदार पावसामुळे तितूर, डोंगरी नदीला पूर आल्याने चाळीसगाव शहरातील पूलावर दुपारपर्यंत नदीचे पाणी वाहत होते. पाटणादेवी परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने नदी -नाले दुथडी वाहत होते. चाळीसगाव तालुक्यात सरासरी 56 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यात केळी, कपाशीची पीके जमीनदोस्त झाली असून बहुतांश ठिकाणी पीकासह शेतांचे बांध फुटल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. दिवसभरात तालुक्यात 398 मि.मी पाऊस झाला आहे.

चाळीसगाव तालुक्यात चाळीसगाव शहरात रात्रीपर्यंत 22 मि.मी, तर बहाळ 24 मि.मी, मेहुणबारे 77 मि.मी,हातले 39 मिमी, तळेगाव 110 मि.मी, शिरसगाव 58 मि.मी, खडकी 68 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

वाघळी, पातोंडा, तळेगाव, खडकी परिसरात शेती पीकाचे अतोनात नुकसान

चाळीसगाव तालुक्यात सरासरी 50 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टी झाली आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून कुठलेही नुकसान झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसामुळे तालुक्यात शेती पीकांचे प्रचंड नुकसान झालेले असतांनाही प्रशासनाकडून नुकसानीबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तालुक्यातील काही मंडळामध्ये 110 मी.मि.पेक्षा जास्त पाऊस झालेला असतानाही प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. तालुक्यातील वाघळी, पातोंडा, तळेगाव, खडकी आदी परिसरात पावसाने कपाशी क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याने तालुक्यात कापूस उत्पादनात मोठी घट निर्माण होणार आहे.