चाहते खुश ! मोहम्मद शमी येतोय…

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचे एक मोठे अपडेट समोर आले आहे. तो दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, आता तो लवकरच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या उंबरठ्यावर आहे. यंदाच्या रणजी चषक स्पर्धेच्या सत्रात सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये शमी बंगाल संघाकडून खेळणार असल्याची चर्चा आहे.

सुत्रानुसार, मोहम्मद शमी रणजी ट्रॉफीमध्ये सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये बंगाल संघाकडून खेळून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. यानंतर तो न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील एका सामन्यात खेळू शकेल. मिळालेल्या माहितीनुसार शमी ११ ऑक्टोबरला यूपीविरुद्ध आणि १८ ऑक्टोबरला बिहारविरुद्धच्या सामन्यापैकी एका सामन्यात खेळू शकतो. दोन सामन्यांमध्ये फक्त दोन दिवसांचे अंतर आहे, त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यातही खेळेल अशी शक्यता फारच कमी आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका १९ ऑक्टोबरपासून बंगळुरू येथून सुरू होईल. यानंतर या मालिकेतील उर्वरित दोन सामने २४ ऑक्टोबरपासून पुण्यात, तर एक नोव्हेंबरपासून मुंबईत खेळविण्यात येतील. ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या दौऱ्याआधी शमी या तीनपैकी एका सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

शमीने गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. हा त्याचा आतापर्यंतचा अखेरचा अंतिम आंतरराष्ट्रीय सामना ठरला. या सामन्यापासून शमी स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये इंग्लंडमध्ये शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली होती.

मोहम्मद शमीने सुरू केला सराव
मोहम्मद शमीने नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो गोलंदाजी करताना दिसत आहे. शमीने टीम इंडियासाठी आतापर्यंत 64 कसोटी, 101 वनडे आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 229, एकदिवसीय सामन्यात 195 आणि T20 मध्ये 24 बळी घेतले आहेत.