नवी दिल्ली : डीपफेक व्हिडिओ तयार करण्यासाठी Artificial Intelligence च्या गैरवापरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिंता व्यक्त केली. तसेच ही मोठी चिंता असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की त्यांनी ChatGpt टीमला डीपफेक व्हिडिओ काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच असे व्हिडिओ इंटरनेटवर प्रसारित केले जातात तेव्हा चेतावणी देण्यास सांगितले आहे.
नरेंद्र मोदी भाजपच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात पत्रकारांना संबोधित करतांना मोदी म्हणाले, “मी नुकताच एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये मी गातोय. माझ्यावर प्रेम असलेल्या अनेक लोकांनी तो फॉरवर्ड केला आहे.” तसेच एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये मी गरबा खेळताना दाखवले आहे पण शाळा सोडल्यापासून गरबा खेळला नाही, असे देखील नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी अनेक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. यामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ आणि काजोलच्या मॉर्फ केलेल्या चेहऱ्यांसह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, चुकीची माहिती पसरवण्यापासून रोखण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी कायदेशीर बंधन आहे. सरकार नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा खूप गांभीर्याने घेत आहे. डीपफेक व्हिडिओ तयार करणे आणि प्रसारित करणे यासाठी 1 लाख दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास, अशी शिक्षा असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.