चिमुकल्यांच्या तस्करीचा दावा साफ खोटा; आरोपीच्या वकिलांचा दावा; आरोपी मौलानाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

तरुण भारत लाईव्ह । भुसावळ : 01040 दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याच्या तक्रारीनंतर भुसावळात रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी भुसावळात 29 तर मनमाडमध्ये 30 मुलांची सुटका केली होती. मानवी तस्करीच्या कलमान्वये या प्रकरणी गुन्हा दाखल होवून पाच संशयितांना अटक करण्यात आली. भुसावळात अटक करण्यात आलेल्या मौलाना मोहम्मद अंजर आलम मोहम्मद सैय्यद अली (44, डूबा, जोकिहाट, अररीया, बिहार, ह.मु.पेठभाग वालवा, काझी गल्ली, काझी मशीद, आस्ठा, जि.सांगली) यास सुरूवातीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती तर कोठडी संपल्यानंतर संशयितास भुसावळ रेल्वे न्यायालयात सोमवारी हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, दोन दिवसात चिमुकल्यांना पुन्हा बिहारातील बालकल्याण समितीकडे सोपवण्यात येणार असून त्यानंतर पालकांना त्यांचा ताबा मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

तस्करीचा गुन्हा खोटा ; आरोपीच्या वकीलांचा दावा

संशयित मोहम्मद अंजर आलम यास भुसावळ लोहमार्ग न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकील अ‍ॅड.नवाब अहमद यांनी युक्तीवादात सांगितले की, संशयित 2013 पासून मुलांना मदरशामध्ये नेत असून या प्रकरणात सखोल चौकशी करायची आहे, त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, उडवा-उडवीची उत्तरे तो देत आहेत, प्रत्येक पालकाडून त्याने तिकीटा व्यक्तिरीक्त एक हजार रुपये घेतले असून त्याच्याकडे कारवाईदरम्यान ही रक्कम आढळली नसल्याने ती कुठे खर्च केली शिवाय अनेक मुलांच्या जन्मतारखा एकसारख्या असून त्याबाबत अधिक तपास करावयाचा असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी तर संशयित आरोपीच्या वकीलांनी मात्र ही मानवी तस्करी नसल्याचे ठासून सांगून संबंधित मुले रीझर्व्ह तिकीटावरून दानापूर एक्स्प्रेसमध्ये शिक्षणार्थ मदरसामध्ये निघाली होती होती शिवाय या मुलांची वा त्यांच्या पालकांची कुठलीही तक्रार नाही, मुलांच्या पालकांनी यंत्रणेला स्वखुशीने मुलांना मदरशामध्ये शिक्षणार्थ पाठवत असल्याचे लिहून दिल्याने पुन्हा पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. संशयित आरोपीतर्फे अ‍ॅड.फिरोज शेख, अ‍ॅड.एहतेश्याम मलिक, अ‍ॅड.ईस्माईल शेख, अ‍ॅड.वसीम खान, अ‍ॅड.मिर्झा आलम यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने संशयित मौलाना मोहम्मद अंजर आलम मोहम्मद सैय्यद अली (44, डूबा, जोकिहाट, अररीया, बिहार, ह.मु.पेठभाग वालवा, काझी गल्ली, काझी मशीद, आस्ठा, जि.सांगली) यास न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, भुसावळ सत्र न्यायालयात संशयिताच्या जामिनाबाबत मंगळवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.