जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी काही केल्या कमी होत नसताना दिसत असून अशातच कौटूंबिक वादातून धारदार हत्याराने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात घडली आहे. रेखाबाई दुरसिंग बारेला (वय ४४) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. दरम्यान, फरार झालेल्या संशयित पती दुरसिंग बारेला यास चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बारेला दाम्पत्य हे धनवाडी शिवारातील योगीराज पाटील यांच्या शेतात वास्तव्यास होते. दरम्यान रेखाबाई बारेला यांची पती दुरसिंग बारेला याने सोमवारी रात्री उशिरा वादातून हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाला. मात्र त्यांची मुले आईच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून होती. दरम्यान मंगळवारी सकाळी हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर चोपडा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पतीने पत्नीची हत्या केलेल्या घटनेची उकल २४ तासात करीत आरोपी पाटील पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, गणेश सोनवणे यांनी ही कारवाई केली आहे.