जळगाव : मुक्ताईनगर येथे बेकायदेशीर पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे , त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्यासह सहा शेतजमीन मालकांना तब्बल १३७ कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची नोटीस बजावण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर येथील तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी ही नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खडसे कुटुंबीय आता पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या नोटीसवरून जळगाव जिल्ह्यातील राजकारण तापलंय. ही कारवाई राजकीय द्वेषातून झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. त्यावरून जिल्ह्यातील दोन मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील विरुद्ध खडसे असा सामना रंगलाय.
एकनाथ खडसे यांना महसूल विभागाने 137 कोटीची दंडाची नोटीस पाठविली. यावरून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाच्या प्रतिनिधींना दंडाची नोटीस बजावली असेल तर नक्कीच ‘दाल में कूछ काला है’ असा टोला लगावला होता. प्रशासनाने कारवाईचे आदेश केल्यामुळेच ती कारवाई होईल. तहसीलदार कोणत्या पक्षाचा आहे का? ज्या ठिकाणाहून गौण खनिजाची चोरी झाली त्याचे मोजमाप निष्पन्न झाल्यानंतरच ही कारवाई झाली असेल. त्यामुळे या कारवाईला राजकीय रंग देऊ नये अशी अपेक्षा आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले होते.
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीही खडसे यांच्यावर उगाचं आमच्या नावाने खडे फोडू नका? चोऱ्या तुम्ही करता आणि खडे आमच्या नावाने फोडता. उलटे सुलटे प्रयोग केले आहेत आणि दोष आम्हाला देता. आता उत्तर द्या! तो डोंगर कोणी खोदला, उंदीर आले होते का खोदायला? अशी टीका केली होती.
मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही खासदार रक्षा खडसे आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. ही कारवाई राजकीय आकसापोटी म्हणत असाल तर आमच्यावरही कारवाई झाल्या आहेत. मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. तुम्हाला 137 कोटी रुपयाचा दंड झाला त्यामुळे त्यांच्या सरकार विरोधी भावना बनल्या आहेत. आधी सरकार चांगलं होतं. आता तुमच्यावर कारवाई झाली तर सरकार चुकीचं झालं का? खडसे कुटुंबियांची आधे इधर, आधे उधर आणि त्यातून कोट्यवधी रुपयांचा फायदा करून घ्यायचा अशी नीती सुरू आहे असेही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, १३७ कोटींच्या या नोटीसवरून आणि दोन मंत्री, एक आमदार यांच्या टीकेनंतर एकनाथ खडसे यांनी ” ही नोटीस राजकीय दबावाने पाठवली. लेकिन मै झुकने वाला नही हु, ना झुकूँगा” असे सांगत मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.